शैक्षणिक ब्लॉगवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे, शेतकरी हायस्कूल, तारगाव 9870710255

विशेषण

 विशेषण :

             नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या व त्या नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दाला विशेषण असे म्हणतात.

उदा. 1)पांढरी टोपी

       2)निळे आकाश

       3) पिकलेला आंबा

       4)दयाळू आई

           वरील वाक्यात पांढरी निळे, पिकलेला, दयाळू हे शब्द नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करतात, म्हणून त्यांना 'विशेषण' असे म्हणतात.

विशेष्य :

            ज्या नामाबद्दल विशेषण येते, त्या नामाला विशेष्य म्हणतात

उदा. लाल टोपी 

      लाल- विशेषण

       टोपी- विशेष्य

अधिविशेषण :

                    नामाच्या (विशेष्य) अगोदर येणाऱ्या विशेषणाला 'अधिविशेषण' म्हणतात.

उदा. हा गोड आंबा आहे. 

विधिविशेषण

                    नामाच्या (विशेष्य) नंतर येणाऱ्या विशेषणाला 'विधिविशेषण' म्हणतात.

उदा: हा आंबा गोड आहे.

विशेषणाचे तीन प्रकार आहेत : 

1) गुण विशेषण :

                   नामाचा गुण किंवा विशेष दाखविणाऱ्या विशेषणाला गुणविशेषण म्हणतात. 

उदा. आंबट बोरे, शूर सरदार.

2) संख्या विशेषण : 

                       नामाची संख्या दाखविणाऱ्या विशेषणाला संख्या विशेषण म्हणतात. 

उदा. चौथा,बंगला, चौपट मुले.

3) सार्वनामिक विशेषण : 

                        सर्वनामांपासून बनलेल्या अशा विशेषणांना सार्वनामिक विशेषणे किंवा सर्वनामसाधित विशेषणे असे म्हणतात. 

उदा. हा मनुष्य, तो पक्षी, तिच्या साड्या.

१. नामसाधित विशेषण :

                               जी नामे पुढे येणाऱ्या नामाबद्दल विशेष माहिती सांगतात, त्यांना 'नामसाधित विशेषण' म्हणतात

उदा. बनारसी शालू, तेलकट पुरी, ऐतिहासिक वस्तू, कोल्हापुरी चप्पल

१. माझा मित्र पुस्तक विक्रेता आहे.

२. आम्ही आज साखर काकडी खाल्ली

३. भारतीय क्रिकेटपटू प्रतिभावान खेळाडू आहे. 

                        वरील वाक्यात अधोरेखित केलेले शब्द हे नामाच्या पुढे येऊन नामाबद्दल विशेष माहिती सांगतात. म्हणून ते 'ना. वि.' होय

माती- मातकट

बुद्धी - बुद्धिवान

शील - शीलवान

 तेलकट - तेल

पाणी- पाणचट

प्रतिभा - प्रतिभावान

श्री - श्रीमंत 

नगर - नागरिक

मती -मतिमंद 

कला - कुशल

शरीर - शारीरिक

वेद - वैदिक

भाषा - भाषिक

गरज - गरजवंत

मन- मानसिक

गुण - गुणवंत

भाग्य - भाग्यशाली

समाज -सामाजिक

मन -मननीय

शास्त्र - शास्त्रीय

राजकारण-राजकीय

२. धातुसाधित विशेषण :

                       धातूपासून बनलेल्या विशेषणांना 'धातुसाधित विशेषण' म्हणतात.

उदा. 

चालणारा हत्ती ('चाल' हा धातू).

बसणारे विद्यार्थी (बस' हा धातू)

पळणारी गाडी ('पळ' हा धातू)

हसणारी बाहुली ('हस' हा धातू)

धावता खेळाडू ('धाव' हा धातू)

रडणार्‍या मुली ('रड' हा धातू)

३. अव्ययसाधित विशेषण : 

                             जी अव्यये विशेषणाचे कार्य करतात, त्यास 'अव्ययसाधित विशेषण' म्हणतात.

उदा .खालचा मजला, मधला दरवाजा,वरची माडी,

वरचा भाग,

            वरील वाक्यात वर, खाली, मागे, पुढे, समोर ही मुळात अव्यय आहेत आणि या अव्ययांपासून हे विशेषण बनलेले आहेत, म्हणून त्यांना 'अव्ययसाधित विशेषण' म्हणतात.