शैक्षणिक ब्लॉगवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे, शेतकरी हायस्कूल, तारगाव 9870710255

क्रियापद

 क्रियापद :

                वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा, क्रियेचा काळ दाखवणारा क्रियादर्शी शब्द म्हणजे क्रियापद होय.

1) सकर्मक क्रियापद: 

                          ज्या क्रियापदाला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज असते त्या क्रियापदाला सकर्मक क्रियापद म्हणतात.

उदा. दीपक चित्र काढतो.

                या वाक्यात दीपक हा कर्ता व चित्र हे कर्म आहे. वाक्यातील चित्र हे कर्म काढून टाकले तर वाक्याचा अर्थ पूर्ण होणार नाही. म्हणजेच, काढतो हे क्रियापद सकर्मक आहे.

2) अकर्मक क्रियापद:

                           ज्या क्रियापदाला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज लागत नाही त्याला अकर्मक क्रियापद म्हणतात.

उदा. रानात झरा वाहतो.

                  या वाक्यात झरा हा कर्ता आहे. या वाक्यात कर्म नाही आणि तरीही वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी वाहतो या क्रियापदाला कर्माची गरज लागत नाही म्हणून वाहतो हे अकर्मक क्रियापद आहे.

3) संयुक्त क्रियापद  : 

                   "धातुसाधित अधिक क्रियापदाने एकाच क्रियेचा बोध होत असेल, तर त्यास'संयुक्त क्रियापद' असे म्हणतात "किवा" धातुसाधित व सहायक क्रियापद यांच्या संयोगाने बनलेल्या क्रियापदाला 'संयुक्त क्रियापद' असे म्हणतात."

उदा. माझे बोलून झाले.

पहिल्या वाक्यात बोलून हे धातुसाधित व झाले हे साहाय्यक क्रियापद आहे. दोन्ही मिळून संयुक्त क्रियापद झाले आहे. दोन्हींतून एकाच क्रियेचा बोध होत आहे.

1.बाळ दोन घास जेवून घे. ('जेवून' हे धातुसाधित तर 'घे' हे सहायक)

२. आम्ही भेटकार्ड बनवीत आहोत.

४. विद्यार्थी गाणी म्हणू लागले.

३. दादा गावाला जात होता.

५. हत्ती मांस खात नाही.

4) सहाय्यक क्रियापद :

                              वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी जे क्रियापद धातुसाधिताला साहय करते, त्याला साहाय्यक क्रियापद म्हणतात

    उदा. आकाशात चांदण्या लुकलुकत होत्या.

             या वाक्यातील 'लुकलुकत' हा शब्द धातुसाधित आहे. तो शब्द क्रियावाचक असला तरी केवळ त्याच्यामुळे वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी त्याला होत्या या क्रियापदाचे साह्य घ्यावे लागले आहे

  5) प्रयोजक क्रियापदे : 

                   “वाक्यात क्रियापदाने दाखविलेली क्रिया कर्त्याला करणे शक्य नसते ती क्रिया दुसऱ्या कोणीतरी  घडवून आणलेली असते. त्यास 'प्रयोजक क्रियापद' म्हणतात.

1) ताई बाळाला हसवते.

2) अत्र्यांनी त्यांना जोरात हसविले.

3)सचिनने पक्ष्यांना झाडावरून उडविले.

4)मदारी माकडाला नाचवितो.

 5)आई मुलाला हसविते.

6)ताई मुलाला रडविते.

   या क्रियापदाची रूपे वितो, विते या प्रत्ययांनी युक्त असतात.

6)शक्य क्रियापद:

                   "जे धातू कर्त्याला क्रिया करण्याची शक्यता, सामर्थ्य आहे असे दाखवितात त्यास - 'शक्य क्रियापद' म्हणतात.

उदा

1)माझ्याने कडू कारले खाववते.

 2) त्याच्याने मैलोन् मैल चालवते.

 3)मला आता काम करवते.

4) वळूला चांगलेच पळवते

5)त्या आजारी माणसाला आता थोडे बसवते. 

 6) राणीला आंबट दही खाववते

 • या क्रियापदामध्ये 'वते' प्रत्यय लावलेले असते.

7)धातूसाधिते (कृदन्ते)

                               : धातूला 'णे, वे, ता, ताना, ऊ, ऊन, ला, वे' हे प्रत्यय लागून क्रियावाचक शब्द बनतात. जसे जेवणे, जेवत, जेवताना वगैरे पण हे शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण न करता ते वाक्यात नाम, विशेषणे, किंवा क्रियाविशेषणे यांची कार्ये करतात. धातूपासून तयार झालेल्या अशा शब्दाना 'धातुसाधिते' किंवा 'कृदन्ते' असे म्हणतात.

8)अध्याहत (गुप्त) क्रियापद :

                                  जेव्हा एखादया वाक्यात आपल्याला क्रियापद दिसत नाही, परंतु ते आपण जाणतो. अशा गुप्त क्रियापदास अध्याहत (गुप्त) क्रियापद म्हणतात.

उदा.1) ग्रंथ हेच गुरु,

       2) आरोग्य हीच खरी संपत्ती.