शैक्षणिक ब्लॉगवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे, शेतकरी हायस्कूल, तारगाव 9870710255

प्रयोग व त्याचे प्रकार

 कर्तरी प्रयोग व त्याचे प्रकार :

१.अकर्मक कर्तरी प्रयोग :

खालील वाक्य पाहा:

ती पोहते.

या वाक्यात पोहते हे क्रियापद आहे. पोहणारी ती म्हणून 'ती' हा कर्ता आहे. पोहण्याची क्रिया कोणावर घडते, या प्रश्नाला उत्तर नाही. याचाच अर्थ वाक्यात कर्म नाही. वाक्यात कर्म नसले, तरी वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. 'पोहणे' हे क्रियापद अकर्मक आहे. वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी त्याला कर्माची मदत लागत नाही, म्हणून हे वाक्य अकर्मक आहे.

2.सकर्मक कर्तरी प्रयोग

खालील वाक्य पाहा:

तो चित्र काढतो.

या वाक्यात 'काढतो' हे क्रियापद क्रिया तो करतो म्हणून 'तो' हा कर्ता. काढण्याची क्रिया चित्रावर होते म्हणून 'चित्र' हे कर्म होय.

आता खालील वाक्ये पाहा:

(१) तू चित्र काढतोस. (पुरुष बदलून)

(२) ती चित्र काढते. (लिंग बदलून)

(३) ते चित्र काढतात. (वचन बदलून)

मूळ वाक्यातील 'तो' या त्यांचे पुरुष-लिंग-वचन यांत बदल केल्याबरोबर क्रियापदाची रूपे बदलली. कर्त्याच्या पुरुष-लिंग-वचनानुसार क्रियापदाचे रूप बदलत जाते. म्हणून हा कर्तरी प्रयोग आहे. यात चित्र' हे कर्म आहे, म्हणून हा सकर्मक कर्तरी प्रयोग आहे.

वरील सर्व वाक्यांतील कर्ते प्रथमा विभक्तीत आहेत. कर्मेही प्रथमा विभक्तीत आहेत

कर्तरी प्रयोगाविषयी लक्षात ठेवायच्या गोष्टी :

(१) कर्तरी प्रयोगात कर्त्याच्या पुरुष-लिंग-वचनानुसार क्रियापद बदलते.

(२) कर्तरी प्रयोगात कर्त्याची प्रथमा विभक्ती असते.

(३) कर्तरी प्रयोगात कर्म प्रथमा किंवा द्वितीया विभक्तीत असते.

कर्मणी प्रयोग :

(१) मुलाने पेढा खाल्ला. (पेढा-कर्म- पुल्लिंग)

(२) मुलाने बर्फी खाल्ली. (बर्फी-स्त्रीलिंग)

(३) मुलाने पेढे खाल्ले. (पेढे-अनेकवचन) 

पहिल्या वाक्यात 'मुलाने' हा कर्ता आहे. त्याचे लिंग-वचन बदलले तरी क्रियापदाच्या रूपात बदल होत नाही. पहिल्या वाक्यात 'पेढा' हे कर्म आहे. त्याचे लिंग-वचन बदलले की क्रियापदाचे रूप बदलते. म्हणून हा कर्मणी प्रयोग आहे. वरील तीनही वाक्यांत कर्त्याची तृतीया विभक्ती आहे व तीनही वाक्यांतील कर्मे प्रथमा विभक्तीत आहेत.

कर्मणी प्रयोगाविषयी लक्षात ठेवायच्या गोष्टी :

(१) कर्माशिवाय कर्मणी प्रयोग होत नाही.

(२) कर्माच्या लिंग-वचनाप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलते. (३) कर्मणी प्रयोगात कर्म नेहमी प्रथमा विभक्तीत असते.

(४) कर्मणी प्रयोगात कर्ता, तृतीया, चतुर्थी, सविकरण तृतीया, षष्ठी विभक्तीत किंवा शब्दयोगी अव्ययान्त असतो.

भावे प्रयोग व त्याचे प्रकार :

१. अकर्मक भावे प्रयोग :

खालील वाक्ये पाहा:

(१) त्याने जावे.

(२) तू जावे. (पुरुष बदलून)

(३) तिने जावे. (लिंग बदलून)

 (४) त्यांनी जावे. (वचन बदलून)

मूळ वाक्यात 'त्याने' हा कर्ता असून, 'जावे' हे क्रियापद आहे. पुढील तीन वाक्यांत कर्त्याचे पुरुष-लिंग-वचन बदलले, तरी क्रियापदाच्या रूपात बदल होत नाही. ते * जावे' असेच राहते. जावे हे क्रियापद तृतीयपुरुषी एकवचनी नपुंसकलिंगी आहे. वरील सर्व वाक्ये अकर्मक आहेत.

सकर्मक भावे प्रयोग :

खालील वाक्ये पाहा :

(१) बापाने मुलाला समजावले.

(२) तुम्ही मुलाला समजावले. (कर्त्याचा पुरुष बदलून)

(३) आईने मुलाला समजावले. (कर्त्याचे लिंग बदलून )

 (४) त्यांनी मुलाला समजावले. (कर्त्याचे वचन बदलून)

मूळ वाक्यात 'बापाने' हा तृतीयपुरुषी एकवचनी कर्ता आहे. पुढील वाक्यांत कर्त्याचे पुरुष-लिंग-वचन बदलूनही 'समजावले' या क्रियापदाच्या रूपात बदल झालेला नाही. 'समजावले' हे क्रियापद तृतीयपुरुषी एकवचनी नपुंसकलिंगी आहे. वरील सर्व वाक्ये सकर्मक आहेत.

भावे प्रयोगाविषयी लक्षात ठेवण्याच्या गोष्टी :

(१) भावे प्रयोगात कर्त्याच्या किंवा कर्माच्या पुरुष लिंग वचनाप्रमाणे क्रियापद बदलत नसून, ते नेहमी स्वतंत्र असते व तृतीयपुरुषी एकवचनी, नपुंसकलिंगी असते. 

(२) भावे प्रयोग सकर्मक व अकर्मक दोन्ही प्रकारचे असतात.

(३) अकर्तृक किंवा भावकर्तृक भावे प्रयोग नेहमी अकर्मक असतात.

 (४) भावे प्रयोगात कर्ता वेगवेगळ्या विभक्त्यांत येतो.

(५) भावे प्रयोगात कर्म नेहमी द्वितीयेत येते.