शैक्षणिक ब्लॉगवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे, शेतकरी हायस्कूल, तारगाव 9870710255

नाम व नामाचे प्रकार

 नामांचे प्रकार

1) सामान्यनाम :

ज्या नामाने एकाच प्रकारचे प्राणी, वस्तू किंवा पदार्थ यांचा बोध होतो, त्या नामाला सामान्यनाम म्हणतात. सामान्यनाम जातिवाचक म्हणजेच प्रकारवाचक असते. प्रत्येक सामान्यनाम ही एक सर्वसंमत अशी संकल्पना असते, 'झाड' म्हटले की आपणा सर्वांच्या डोळ्यांसमोर, मुळे जमिनीत रुजलेली मध्ये खोड आणि वर फांदया व पाने असे एक चित्र उभे राहते. एकाच जातीच्या वस्तूंत सारखेपणा असतो, म्हणून अशा नामांना सामान्यनाम म्हणतात.

उदा., माणूस, पर्वत, नदी, इमारत, झोपडी खुर्ची लेखणी इत्यादी. दूध, भाकरी, श्रीखंड, सोने, चांदी, लोखंड यांना पदार्थवाचकनामे म्हणतात. 

             अरण्य, गुच्छ, कळप, जथा, थवा अशा शब्दांत समूहाची जाणीव व्यक्त होते म्हणून त्यांना समूहवाचक किंवा समुदायवाचक नामे म्हणतात. या सर्वांचा समावेश सामान्यनामांतच होतो.

२ ) विशेषनाम

ज्या नामाने एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा ठिकाणाचा बोध होतो त्या नामाला विशेषनाम म्हणतात.

 उदा., नलिनी, संदीप, चेतक, भारत, हिमालय, अमेरिका, चंद्र, सूर्य ही सर्व विशेषनामे आहेत. ही नावे त्या त्या वस्तूंना आवर्जून दिलेली असतात. त्या नावाने ती विशिष्ट व्यक्ती, प्राणी किंवा ठिकाण ओळखले जाते.

३ ) भाववाचकनाम किंवा धर्मवाचक नाम :

च्या नामाने व्यक्ती, प्राणी, पदार्थ किंवा वस्तू यांच्यातला भाव किंवा गुणधर्म यांचा बोध होतो, त्या नामाला भाववाचकनाम म्हणतात. 

उदा., व्यक्तीबाबत वात्सल्य, क्रौर्य, ममता, दया, जन्म, आनंद, दु:ख, मृत्यू ,

पदार्थाबाबत गोडी, आंबटपणा, खारटपणा, कपणा वगैरे. वस्तूबाबत शुभता खडबडीतपणा, मुलायमता, ओलावा वगैरे.

Tags